नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते अद्याप बाकी
नोव्हेंबर महिना उलटून डिसेंबरही संपत आला आहे, मात्र लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी अद्याप हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे प्रत्येकी १५०० रुपये असे एकूण ३००० रुपये एकत्रितपणे खात्यात जमा होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही तांत्रिक कारणे आणि निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या वितरणाला विलंब झाला असून, लाभार्थ्यांच्या मनात हप्ता कधी येणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारने हिवाळी अधिवेशनात ६१०३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असली, तरी प्रत्यक्ष वाटपासाठी प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य
योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सध्या अर्जांची छाननी आणि ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया राबवली जात आहे. ज्या महिलांची पूर्वी केवायसी करताना चूक झाली होती किंवा ज्या एकल, घटस्फोटित आणि परितक्त्या महिला आहेत, त्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण होणार नाही, त्यांचे पुढील लाभ खंडित होऊ शकतात. त्यामुळे, प्रलंबित हप्ता मिळवण्यापूर्वी आपली केवायसी प्रक्रिया अधिकृत पोर्टल किंवा ॲपवरून पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.




















